चेन्नई - तामिळनाडूमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यसरकारने याबाबत माहिती दिली आहे. आज पहाटेच, तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
COVID-19 LIVE : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६, देशभरातील अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर... - undefined
15:08 March 25
तामिळनाडूमध्ये आढळले पाच नवे रुग्ण..
15:03 March 25
बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला देणार एक हजार रुपये..
पाटणा- कोरोनाच्या संकटामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी बिहार सरकारने नवा निर्णय घेतला आहे. राज्यातील रेशनकार्ड असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सरकारकडून एक हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
14:47 March 25
दिल्लीतील औषध व सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी..
नवी दिल्ली -दिल्लीमधील सर्व औषध आणि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांना इथेनॉल-युक्त हँड सॅनिटायझर बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत या कंपन्या हे सॅनिटायझर बनवू शकतात. तसेच, यासाठी त्यांना वेगळ्या परवान्याचीही आवश्यकता नाही, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले.
14:37 March 25
एक कोटी किंमतीचे चार लाख मास्क मुंबई पोलिसांनी केले जप्त..
मुंबई - मुंबई पोलिसांनी सुमारे एक कोटी किंमतीचे चार लाख मास्क जप्त केले आहेत. मुंबई विमानतळ कार्गो टर्मिनलच्या जवळ असणाऱ्या एका गोडाऊनमधून हे मास्क जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे.
14:32 March 25
मिझोराममध्ये आढळला पहिला रुग्ण, ख्रिस्ती धर्मगुरूला कोरोनाची लागण..
ऐजवाल- मिझोराममध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. नेदरलँडमधील अॅमस्टरडॅमहून तो भारतात परतला होता. ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या या रुग्णाला झोराम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री आर लथांग्लियाना यांनी दिली.
14:23 March 25
मुंबई - कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात 21 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे रेल्वे तसेच वाहतूक सेवा ठप्प असल्याने नागरिक अडकून पडले. मात्र संचारबंदीत पुष्पक एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याची अफवा पसरल्याने हजारो नागरिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यामुळे या नागरिकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
वाचा :पोलिसांनी शेकडो नागरिकांना रेल्वे स्थानकावर 'चोपले'; संचारबंदीत अफवेवर विश्वास ठेवणे पडले महाग
14:22 March 25
नवी दिल्ली - देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठीच्या उपाययोजनावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर चर्चेदरम्यान मंत्री एकमेकांपासून अंतर राखून बसल्याचे पाहायला मिळाले.
वाचा :कोरोनाचा कहर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी राखले अंतर
14:21 March 25
पुणे - शासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव ठाण्याच्या पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी भाजी मंडईमध्ये एक मीटरच्या अंतरावर बॉक्स तयार केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
वाचा :गर्दी टाळण्यासाठी लढवली 'ही' शक्कल, पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव
13:55 March 25
राज्यात आज आढळले नऊ नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११६..
मुंबई- आज सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबईमध्ये चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ११६वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
13:12 March 25
राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध, मुख्यमंत्र्यांची माहिती..
मुंबई - राज्यामध्ये अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच, सर्व अत्यावश्यक सामान पुरवणारी दुकाने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या समोरचे हे संकट टळल्यानंतर आपण गुढीपाडवा साजरा करूयात, असा संदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला आहे.
12:48 March 25
देहराडूनमधील कोरोनाच्या रुग्णावरील उपचार यशस्वी..
देहराडून - उत्तराखंडमधील एका कोरोनाच्या रुग्णावरील उपचार यशस्वी झाले आहेत. स्पेनमधून आलेल्या या ट्रेनी आएएस अधिकाऱ्याला मागील गुरूवारी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आज त्याची तपासणी केली असता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
12:36 March 25
पद्दुचेरीमधील पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द; सर्व विद्यार्थी होणार पास..
पद्दुचेरी- पंतप्रधान मोदींनी घोषित केल्यामुळे देशात सगळीकडे बंदी आहे. त्यामुळे पद्दुचेरीमधील वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे, अशी माहिती पद्दुचेरीच्या शालेय शिक्षण संचलनालयाने दिली आहे.
12:30 March 25
राजस्थानमध्ये आढळले चार नवे रुग्ण, भिलवाडामधील दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश..
जयपूर - राजस्थानात कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भिलवाडामधील दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यानंतर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली आहे.
12:24 March 25
कर्नाटकात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू, कोरोना चाचणीचा अहवाल मागवला..
बंगळुरू - मक्क्याहून आलेल्या एका वृद्ध महिलेचा कर्नाटकातील चिक्काबल्लापूरमध्ये मृत्यू झाला आहे. १५ मार्चपासून त्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. श्वसनाच्या विकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल मागवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिली आहे.
12:09 March 25
केजरीवाल आणि बिजलाल यांची संयुक्त पत्रकार परिषद, जनतेला केले न घाबरण्याचे आवाहन..
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आणि लेफ्टनंट जनरल अनिल बिजलाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले. केजरीवाल यांनी लोकांनी साठेबाजी करू नये, तसेच खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये असे आवाहन केले. तर, दिल्लीमध्ये काटेकोरपणे लॉकडाऊन पाळला जाईल याची आम्ही खात्री करू, असे बिजलाल यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, लोकांना गरजेच्या वस्तू वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळतील, याकडे आम्ही लक्ष देत असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच, गरजेच्या वस्तू पुरवणाऱ्या लोकांना विशेष पास, आणि या सुविधा पुरवण्यासाठी दुकानदारांना विशेष ई-पास देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
12:02 March 25
मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलच्या वतीने घेण्यात येणारी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
11:53 March 25
जागतिक बुद्धीबळ ऑलिम्पियाड ढकलले पुढे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय..
नवी दिल्ली - जागतिक बुद्धिबळ महासंघाने यावर्षी होणारे ऑलिम्पियाड पुढे ढकलले आहे. आता ही स्पर्धा २०२१ साली होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
11:50 March 25
पाकिस्तानमधील कोरोनाच्या रुग्णांनी ओलांडला हजारचा टप्पा, देशात आतापर्यंत सात बळी..
इस्लामाबाद -पाकिस्तानमधील कोरोनाच्या रुग्णांनी एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर, देशात कोरोनामुळे आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान सरकारने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
11:41 March 25
डॉक्टरांना बाहेर काढणाऱ्या घरमालकांविरोधात कडक कारवाई करण्यास केंद्राची परवानगी..
नवी दिल्ली- कोरोना विषाणूशी लढा देत, स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्याचे निंदनीय कृत्य काही घरमालक करत आहेत. या घरमालकांविरोधात कडक कारवाई करण्याची परवानगी विभागीय उपायुक्तांना देण्यात आली आहे. केंद्र शासनाने याबाबतचे निर्देश दिले आहेत.
11:40 March 25
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी २१ दिवस देश बंद ठेवण्याची घोषणा मंगळवारी रात्री केली. त्यानुसार या आपात्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासंबधित सूचना गृहमंत्रालयाने जारी केल्या आहेत.
11:39 March 25
नवी मुंबई- जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडल्या जाणाऱ्या भाजीपाला खरेदीसाठी बुधवारी पनवेलच्या बाजार समितीत प्रचंड गर्दी झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या, तरी नागरिकांना कसलेच गांभीर्य नाही. यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदीची पायमल्ली नागरिकांतर्फे केली जात असल्याचे दिसून आले.
वाचा :संचारबंदीची पायमल्ली, पनवेलच्या बाजार समितीत नागरिकांची तुफान गर्दी....
11:39 March 25
गडचिरोली- जिल्ह्यातील शहरी भागात नागरिक कोरोनाविषयी विशेष खबरदारी बाळगताना दिसत नाही. मात्र, दुब्बागुडा या आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी गावात कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच गावाच्या वेशीवर बैलगाडी आडवी ठेवून परवानगी शिवाय आत येऊ नये, असे बॅनर लावले आहे. त्यामुळे या गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वाचा :भाऊ, दुरूनच राम राम..! आमच्या गावात येऊ नका; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुब्बागुडा गावात प्रवेशबंदी
11:26 March 25
कोरोनाला लढा देण्यासाठी व्हाईट हाऊसकडून दोन ट्रिलियन डॉलर्स मंजूर..
वॉशिंग्टन- कोरोना विषाणूच्या संकटाला लढा देण्यासाठी दोन ट्रिलियन डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला आहे. व्हाईट हाऊस आणि अमेरिकेच्या सिनेटने या निधीसाठी परवानगी दिली आहे.
11:01 March 25
तेलंगाणामध्ये आढळले तीन नवे रुग्ण..
हैदराबाद- तेलंगाणामध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली आहे.
10:46 March 25
राज्यात आढळले पाच नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११२..
मुंबई -राज्यात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११२वर पोहोचली आहे. यामधील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सुमारे १५हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
10:35 March 25
गुजरातमध्ये आढळले तीन नवे रुग्ण, राज्यातील संख्या ३८ वर..
गांधीनगर- गुजरातमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३८ झाली आहे. दरम्यान, विलगीकरण न पाळणाऱ्या १४७ लोकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मुख्य सचिव जयंती रवी यांनी दिली आहे.
10:25 March 25
उत्तर प्रदेशमध्ये आढळला कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३६ वर..
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमधील एका ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. हा व्यक्ती परदेशातून आला नसून, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे इथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. सुधीर सिंह यांनी ही माहिती दिली.
10:21 March 25
तेहरानमधून आलेल्या भारतीयांना ठेवले लष्कराच्या विलगीकरण कक्षात..
जयपूर- इराणवरून भारतात आलेल्या २७७ नागरिकांना दिल्लीहून जोधपूरला नेण्यात आले. त्यानंतर त्यांची विमानतळावर तपासणी करुन, त्यांना जोधपूरमधील लष्करी तळावर असणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात आले आहे. पुढील काही दिवस हे नागरिक याठिकाणीच निरिक्षणाखाली असणार आहेत.
09:46 March 25
देशातील रुग्णांची संख्या ५६२वर, तर नऊ जणांचा बळी; आरोग्य मंत्रालयाची माहिती..
नवी दिल्ली- देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५६२ वर पोहोचली असून, आतापर्यंत यामुळे नऊ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या ५६३ पैकी ५१२ 'अॅक्टिव्ह केसेस' आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले आहे. यासोबतच, ४० रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये काल (मंगळवार) संध्याकाळी कोरोनाचा बळी आढळून आला होता. मात्र, मृत्यूपूर्वी या रुग्णावरील कोरोनाचे उपचार यशस्वी झाले होते. त्यामुळे मृत्यू झाला तेव्हा हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही, तर निगेटिव्ह होता, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
09:29 March 25
इंदौरमध्ये आढळले पाच नवे रुग्ण..
भोपाळ- मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
09:02 March 25
भारतात अडकलेले रशियन नागरिक मायदेशी रवाना..
नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर बंदी जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा याआधीच बंद केल्यामुळे सुमारे ३८८ रशियन नागरिक भारतातच अडकले होते. त्यांना मायदेशी नेण्यासाठी देशातील रशियन दूतावासाचे प्रयत्न सुरू होते. यानंतर आता एका विशेष विमानाने या नागरिकांना रशियामध्ये नेले जात आहे.
08:50 March 25
गुजरातहून बिहारला परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या ४ वर..
पाटणा- बिहारमध्ये कोरनोचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. २९ वर्षांचा हा रुग्ण पाटणाच्या नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होता. हा व्यक्ती गुजरातच्या भावनगरहून परतल्याची माहिती नालंदा रुग्णालयाचे नोडल ऑफिसर अजय सिन्हा यांनी दिली. यानंतर राज्यातील रुग्णांची संख्या चार झाली आहे.
08:45 March 25
इराणमधील २७७ भारतीय परतले मायदेशी..
तेहरान - इराणमधील २७७ भारतीय आज सकाळी मायदेशी परतले. इराणच्या तेहरानमधून या नागरिकांना घेऊन निघालेले 'महान' विमान आज पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले.
08:08 March 25
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'फ्लिपकार्ट'ची सेवा राहणार बंद..
नवी दिल्ली - ऑनलाईन वस्तू विक्री करणारी वेबसाईट फ्लिपकार्टने आपली सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी २१ दिवस संपूर्ण देशात बंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही लवकरच आमची सेवा पूर्ववत करू, तोपर्यंत तुम्ही घरातच रहा, आणि सुरक्षित रहा, असे आवाहनही कंपनीने लोकांना केले आहे.
07:53 March 25
कोरोनाला लढा देण्यासाठी 'जी-२०' देशांची 'विशेष व्हर्च्युअल परिषद'..
रियाध - कोरोना विषाणूबाबत जागतिक स्तरावर पावले उचलण्यासाठी 'जी-२०' देशांच्या प्रमुखांची परिषद उद्या (गुरुवार) पार पडणार आहे. ही परिषद व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलाजीज अल सौद हे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडणार आहे.
07:40 March 25
राज्यातील पहिल्या दोन रुग्णांवर उपचार यशस्वी, दोघेही कोरोना निगेटिव्ह!
पुणे - दोन आठवड्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन रुग्णांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. या दोघांवरील उपचार यशस्वी झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. राज्यातील हे पहिले दोन रुग्ण होते. कोरोनाच्या रुग्णांची उपचारांनंतर खात्रीसाठी दोनवेळा तपासणी करण्यात येते. या दोनही तपासण्यांमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
याआधी मंगळवारी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले होते.
07:27 March 25
तामिळनाडूमध्ये कोरोनाचा बळी, मदुराईमध्ये एकाचा मृत्यू..
चेन्नई -तामिळनाडूमधील मदुराईमध्ये एका कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील राजाजी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू होते. या व्यक्तीला मधुमेह, अती तणाव असे आजारही होते. तामिळनाडू राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सी. विजयशंकर यांनी ही माहिती दिली.
07:20 March 25
कोरोना विषाणूचा प्रसार चीनबाहेर वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये इटलीमध्ये ७४३ जणांचा मृत्यू झाला, तर जगभरात सुमारे दोन हजार लोकांचा बळी गेला आहे. भारतातही याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंगळवारपर्यंत देशात कोरोनाचे ५३६ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.