नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात 991 नवे रुग्ण आढळून आले असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 14 हजार 378 वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांपैकी 11 हजार 906 रुग्ण अॅक्टिव आहेत. तर, 1 हजार 192 जण पूर्णत: बरे झाले आहेत. देशातील कोरोनाच्या बळींची संख्या 480 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
सामाजिक अंतर राखणे, खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्क वापरणे ,हात धुणे याप्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, देशात कोरोनाचे थैमान असूनही काही नागरिक त्याचे पालन करत नसल्याचे चित्र असून लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे पाहायला मिळत आहे.