तिरुवअनंतपुरम - कोरोना विषाणूचा भारतातील प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या खबरदारीचा उपाय म्हणून आपापल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा देत आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी, राज्यातील इंटरनेटची क्षमता ३० ते ४० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन घरून काम करणाऱ्या लोकांनाही आपल्या ऑफिसप्रमाणेच चांगल्या वेगाची इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल.
केरळमध्ये गुरुवारी तीन नवे रुग्ण आढळून आल्यामुळे, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अनेक आयटी कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा दिली आहे. या पार्श्वभूमीवर, विविध टेलिकॉम कंपन्यांनी एकमताने इंटरनेटची क्षमता वाढवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. तसेच, यासाठी आपल्याकडे आवश्यक ती सुविधा असल्याची हमी या कंपन्यांनी सरकारला दिली आहे.