हैदराबाद -भारतातील कोरोना रुग्णसंख्येने 20 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. गुरुवारी दिवसभरात 62 हजार 538 रुग्ण वाढले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज जाहीर केली.
भारतातील कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी भारतातील कोरोना रुग्णसंख्या 20 लाख 27 हजार 75 एवढी झाली आहे. देशात सध्या 6 लाख 7 हजार 384 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 13 लाख 77 हजार 106 हा रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात कोरोनामुळे 41 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 4 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले असून 16 हजार 792 जण मृत्युमुखी पडले आहेत. तामिळनाडूमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 4 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 4 हजार 59 जणांचा मृत्यू झाला आहे. चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, लडाख, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि अंदमान व निकोबारमध्ये 1 हजारपर्यंत सक्रिय रुग्ण आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्याकडील एकत्रित माहितीनुसार, देशभरात 6 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 27 लाख 88 हजार 393 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गुरुवारी 6 लाख 39 हजार 42 नमुन्यांची तपासणी केली गेली.