नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे, यात 44 हजार 29 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 20 हजार 916 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 2 हजार 206 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशभरामध्ये कोरोनामुळे 2 हजार 206 जण दगावले महाराष्ट्रामध्ये 22 हजार 171 कोरोनाबाधित असून 832 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 8 हजार 194 कोरोनाबाधित असून 493 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 6 हजार 923 कोरोनाबाधित तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशात तिसऱ्या लॉकडाऊनचा आता शेवटचा आठवडा सुरू असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. मागील ४९ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक, बाजारपेठासह सर्वकाही ठप्प आहे.
कधी संपते कोरोना साखळी -
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.