नवी दिल्ली- कोरोनाच्या गंभीर संकटाबाबत चर्चा करण्यासाठी गुरूवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधींनीही उपस्थिती दर्शवली होती.
मागील वर्षी जूनमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर, ऑगस्टमध्ये राहुल गांधींनी शेवटच्या कार्यकारिणी बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीमध्येच सोनिया गांधींची काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला हजेरी लावली नव्हती.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले, की राहुल गांधींना या बैठकीला पाहून पक्षाने समाधान व्यक्त केले आहे. कारण, राहुल गांधी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगताना दिसत होती.