चेन्नई : कित्येक महिन्यांच्या कालावधीनंतर आता इस्रो पुन्हा अवकाशात यान पाठवण्यासाठी सज्ज झाले आहे. उद्या (शनिवार) इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकल-सी४९ (पीएसएलव्ही सी४९) मार्फत देशाच्या रेडार इमेजिंग उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात येईल. यासोबतच, नऊ परदेशी कृत्रीम उपग्रहांचेही प्रक्षेपण इस्रो करणार आहे.
काऊंटडाऊन सुरू होणार
यासाठीचे काऊंटडाऊन आज सुरू होणार आहे. हे २६ तासांचे काऊंटडाऊन असणार आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता हे रॉकेट दहा कृत्रीम उपग्रहांना घेऊन उड्डाण करेल. श्रीहरीकोटाच्या रॉकेट पोर्टवरुन हे प्रक्षेपण होणार आहे. २०२०मधील इस्रोची ही पहिलीच अवकाश यात्रा असणार आहे.
नऊ विदेशी उपग्रह..
इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या नऊ विदेशी उपग्रहांमध्ये लिथुआनिया (१), ल्युक्सेमबोर्ग (४) आणि अमेरिकेच्या (४) उपग्रहांचा समावेश आहे. मात्र, मुख्यत्वे पीएसएलव्ही सी ४९ मार्फत भारताचा रेडार इमेजिंग उपग्रह इओएस-०१ हा अवकाशात पाठवण्यात येणार आहे. यामध्ये सिंथेटिक अपार्चर रेडार (एसएआर) बसवले आहे, जे कोणत्याही प्रकारच्या हवामानात स्पष्ट छायाचित्रे घेऊ शकते.