मुख्यमंत्री येदियुराप्पांना झटका, सर्वोच्च न्यायालयात ९ वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचार प्रकरणावर होणार सुनावणी
हे प्रकरण कर्नाटकातील एका भूखंड घोटाळ्याशी संबंधित आहे. ते पुन्हा सुरू करताना 'येदियुराप्पा आणि शिवकुमार या हाडवैऱ्यांनी त्यांच्या विरोधातील हे प्रकरण बंद व्हावे, यासाठी एकत्रितपणे ताकद लावली होती,' याचाही सर्वोच्च न्यायालयाने विचार केला आहे.
नवी दिल्ली -कर्नाटकचे भाजप अध्यक्ष बी. एस. येदियुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने येदियुराप्पा आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्याविरोधातील ९ वर्षांपूर्वीचे भ्रष्टाचार प्रकरण पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दिली आहे. तथापि, हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्याचा हेतू आणि दृष्टिकोन पडताळण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
'येदियुराप्पा आणि शिवकुमार या हाडवैऱ्यांनी त्यांच्या विरोधातील हे प्रकरण बंद व्हावे, यासाठी एकत्रितपणे ताकद लावली होती,' याचाही सर्वोच्च न्यायालयाने विचार केला आहे. न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या सामाजिक सेवकाच्या याचिकेला परवानगी द्यावी किंवा नाही, याविषयी विचार करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी घेतला. हे प्रकरण कर्नाटकातील एका भूखंड घोटाळ्याशी संबंधित आहे. यात रिस्ट्रिक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ लँड अॅक्टचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
येदियुराप्पा यांचा शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर काही तासांतच हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. राज्यपाल वजूभाई वाला यांनी येदियुराप्पा यांना ३१ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.