नवी दिल्ली -कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला असून अनेक देशामंधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात रुग्णांनी 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील अनेक नामांकित कंपन्या आणि संस्था कोरोनावर लस शोधत आहेत. अनेक लसी विकासाच्या तिसऱ्या टप्प्यावरही पोहोचल्या आहेत. अशात पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीवरून महत्त्वाचे वक्तव्य केल आहे.
कोरोना लस परवडणाऱ्या किंमतीत असायला हवी, तसेच ती सार्वत्रिकपणे उपलब्ध असावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जगभरातील औषध निर्मिती कंपन्या लस संशोधन करत आहेत. मात्र, लस शोधल्यावर नफा कमविण्यासाठी स्पर्धा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लस तयार झाल्यावर भारतातीली मोठ्या जनसंख्येचे लसीकरण कसे करण्यात येईल याच्या तयारीचा आढावा पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवारी) घेतला. लसीकरण करण्यासाठी सरकारची तयारी आणि नियोजनासंदर्भात मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
लस निर्मितीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. लसीकरणासाठी भारताच्या बांधिलकीवरही मोदींनी प्रकाश टाकला. भारताच्या अवाढव्य आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अति धोकादायक गटात असलेली लोकसंख्या, विविध संघटनांमधील समन्वय आणि प्रक्रिया याबरोबरच खासगी क्षेत्राचा सहभाग याचा बैठकीत विचार करण्यात आला.