चैन्नई - भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. यामध्ये पत्रकारांनाही कोरोनाची बाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. चैन्नईमधील तामिळ वृत्तपत्राच्या 39 पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली आहे.
सर्व पत्रकारांवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपनीने स्वतःच आपल्या कर्मचार्यांचा खर्च उचलला आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून हे पत्रकार कार्यालयात काम करत होते. कार्यालयामध्ये आवश्यक वस्तू पूरवणाऱया डिलेव्हरी बॉयच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.
दरम्यान तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 18 हजार 545 कोरोनाबाधित आढळले असून 133 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वांत जास्त कोरोनाबाधित तामिळनाडूमध्ये आढळले असल्याची माहिती आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखापेक्षा अधिक झाला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी कोरोनासंबधित कर्तव्यावर असताना पत्रकाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरीही पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.