नवी दिल्ली - भारतात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. पंजाबमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे.
पंजाब राज्यातील अमृतसर येथे 2 बाधित तर जम्मू काश्मीरमध्ये 2 संशयित रुग्ण सापडले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच होळी आणि महिला दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, असे आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे.
कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये जवळपास १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे.