हैदराबाद- कोरोनाबाधित व्यक्तीने श्वासोश्वास घेत असताना हवेत सोडलेल्या लहान कणांपासून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असा अहवाल राष्ट्रीय विज्ञान संस्थेने दिला आहे. या अहवालात नोंदवलेली निरीक्षणे अंतिम नसली तरी याचा संस्थेने इन्कार केलेला नाही.
कोरोना विषाणूचा प्रसार कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती शिंकल्यामुळे हवेत प्रसारित होणाऱ्या थेंबामुळे होते असल्याचे मानण्यात येते. संसर्गित व्यक्ती शिंकल्यामुळे बाहेर पडलेले थेंब वस्तू किंवा पृष्ठभागावर पडतात. याच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग होतो असे समजले जात होते.
सर्जिकल मास्कचा वापर केल्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीपासून होणाऱ्या संसर्गाची साखळी रोखता येऊ शकते असे हाँगकाँग विद्यापीठाच्या एका अप्रकाशित अभ्यासाच्या हवाल्याने राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या श्वसन आजाराच्या रूग्णांकडून श्वसनाचे थेंब आणि एरोसोल यांचे नमुने घेतले होते. यापैकी काही रुग्णांनी सर्जिकल मास्क घातला होता.सर्जिकल मास्क घातल्यास कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएंझाचा प्रसार रोखता येऊ शकतो, असे परिणाम आम्हाला दिसून आले, असे संशोधकांनी सांगितले आहे.
कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी दवाखान्यातील बेड मध्ये दोन मीटर पेक्षा जास्त अंतर असावे, त्यापेक्षा कमी अंतर पुरेसे नाही, असे अहवालात म्हटले आहे. 2 एप्रिल पर्यंत दहा लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात 50 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.