चंदीगड - कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोक घरातून फारसे बाहेर पडू शकत नसल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, सध्या व्यायामशाळाही बंद आहेत. लोकांनी घरच्या घरी व्यायाम कसा करावा, याच्या काही टिप्स आयुष प्रोजेक्टचे योग इन्स्ट्रक्टर वीरेंद्र सिंह यांनी दिल्या आहेत.
लॉकडाऊनदरम्यान आपले आरोग्य कसे सांभाळाल? प्रश्न - लॉकडाऊनचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे?
उत्तर - लोक दिवसभराचा सगळा वेळ घरात घालवत आहेत. घरी असल्याने अनेकदा खाणेही जास्त होते. मात्र, शारीरिक हालचाली नसल्यामुळे आणि जास्त खाल्ल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
प्रश्न - खाण्यापिण्याचा प्रकृतीवर किती परिणाम होतो?
उत्तर - खाण्यापिण्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. तुम्ही काय खाता, किती खाता, किती वेळा खाता, या सर्वांचा आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही घरी असाल तरीही पौष्टिक खाल्ले पाहिजे. फळेही खाणे आवश्यक आहे.
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर, वजन वाढू शकते आणि शरीरातील कोलेस्टेरॉलची प्रमाणही वाढू शकते. तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागत असेल तर, एकदाच खूप न खाता तीन-चार वेळा थोडे थोडे खावे. असे केल्यामुळे पचन लवकर होते आणि आरोग्यावर जास्त परिणाम होत नाही. शक्य ती शारीरिक कामे करण्याचा प्रयत्न करावा.
प्रश्न - घरी राहून काय करावे?
उत्तर -
- सकाळी संध्याकाळी दोन वेळा योग करावा.
- योग करू शकत नसाल तर व्यायाम करावा.
- घरच्या शक्य त्या प्रत्येक कामांमध्ये घरातील लोकांना मदत करावी.
- केर झाडणे, फरशी पुसणे, कपडे धुणे ही तीनही कामे केल्यामुळे चांगला व्यायाम होतो. ही कामे करणे आवश्यक आहे.
प्रश्न - घरात राहून कोणती आसने करणे शक्य आहे?
उत्तर -
- घरी असताना दिवसभर काही ना काहीतरी काम करत राहणे आणि खाण्यापिण्यावर लक्ष देणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
- घरी राहून अनुलोम-विलोम करणे शक्य आहे.
- यानंतर प्राणायाम आणि भस्त्रिका ही आसने करावीत.
- याशिवाय, तुम्ही ध्यान करूनही तुमचा मेंदू शांत करू शकता.