नवी दिल्ली - जगामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जगामध्ये ९३ लाख ४५ हजार ५६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४ लाख ७८ हजार ९४९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ५० लाख ३६ हजार ७२३ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
भारतात मागील २४ तासांमध्ये नव्या रुग्णांनी १५ हजारांचा आकडा पार केला. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या ४ लाखांच्यावर गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १५ हजार ९६८ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर, ४६५ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
जगामध्ये सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकी तज्ज्ञ डॉ. अॅन्थनी फौसी यांनी अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची दुसरी साथ येण्याची शक्यता वर्तवली आहे. देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असा त्यांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या टेक्सास भागामध्ये एक दिवसात ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. टेक्सास परिसरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.