पाटना - मुळचा बिहारमधील युवकाचा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण कोरोनाचा संभाव्य रुग्ण होता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी कोरोना झाल्याची शक्यता फेटाळत मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. तसेच याला जबाबदार असलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
गणेश यादव हा युवक मुळचा बिहामधील पाटना जिल्ह्यातील मनेर येथील रतनटोला गावचा रहिवासी आहे. सहा महिन्यांपूर्वी तो बिहारवरून धुळ्यातील एका दुध डेअरीमध्ये कामासाठी आला होता. तेथे गायींची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते. मात्र, २९ एप्रिलला त्याची अचानक तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याला कोरोना असल्याचा संशय असल्याने मृतदेह कुटुंबीयांच्या हाती न सोपवता महाराष्ट्रातच अंत्यसंस्कार करण्यात आले.