हैदराबाद - केंद्र शासनाने देशातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवला आहे. मात्र, यावेळी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. देशभरातील जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये विभागणी करून त्याप्रमाणे सूट देण्यात आली आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे.
लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यासाठी कराव्या लागतील या गोष्टी -
१) टेस्टींग(चाचणी) - जास्त प्रमाणात नागरिकांच्या चाचण्या केल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यास मदत होऊ शकते. कारण अनेक लोकांना कोरोनाची लागण होऊनही त्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नाही. हीच लोक कोरोनाचे वाहक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे.
२) ट्रॅकिंग - कोरोना रुग्णांचा शोध घेणे हे सर्वांत मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे. अॅपल आणि गुगल यांसारख्या डिजिटल कंपन्या यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये गव्हर्नर जॉन हॉपकिन्स एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेसोबत मिळून काम करत आहेत.
३) ईम्यून(रोग प्रतिकारक क्षमता) - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरीरात रोग प्रतिकारक क्षमता असणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनाची लस बनवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी स्वत:ची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
४) नवीन सामान्य नियम - मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात स्वच्छ करणे यांची सवय लावून घेणे अतिशय गरजेचे आहे.
लॉकडाऊन उठवण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'ने तयार केलेली नियमावली -
- कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात असावा. कोरोना रुग्ण शोधण्यात आणि उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे.
- शाळा आणि कार्यालयांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या असाव्यात.
- नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे, क्वॉरंटाईन राहणे यासारख्या उपायांसाठी तयार असावे.
'येथे' काढण्यात आला आहे लॉकडाऊन -
हाँगकाँगमधील ९९ टक्के नागरिक मास्कचा वापर करत आहेत. गर्दी न करता आपली कामे करत आहेत. हाँगकाँगचे मॉडेल सर्वांत प्रभावी मानले जात आहे. येथे आत्तापर्यंत १ हजार ४० कोरोनाबाधित रुग्ण होते. सध्या यातील १७७ जण उपचार घेत आहेत तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ८५९ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे येथील लॉकडाऊन हटवण्यात आला आहे.
चेक प्रजासत्ताकमध्ये ५ टप्प्यात उठवण्यात आला लॉकडाऊन -
कोरोनाने पहिला मृत्यू होण्याअगोदरच चेकमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती. सध्या येथे पाच टप्प्यात लॉकडाऊन काढण्यात येत आहे. २० एप्रिलला कृषी बाजारपेठा आणि वाहनांची खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२७ एप्रिलपासून दुकाने, जिम सुरू करण्यात आले आहेत. हॉटेल आणि सलून मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला सुरू करण्याचा विचार शासनाचा आहे. ब्रिटन सध्या चेक प्रजासत्ताकाच्या उपाययोजनांचा अभ्यास करत आहे.
लॉकडाऊन सुरू करण्याअगोदर नागरिकांना खरेदीसाठी ४८ तासांचा वेळ देणारा चेक हा एकमेव देश आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले. पाच आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर चेकच्या पंतप्रधानांनी देशाने कोरोनाची लढाई जिंकल्याचे जाहीर केले.