चेन्नई - तामिळानाडू राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 411 वर पोहचला आहे. त्यातील 102 रुग्ण मागील 24 तासांत आढळून आले आहेत. 1 हजार 580 संभाव्य रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सी. विजयाभास्कर यांनी दिली.
तामिळनाडूत कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढली?
तामिळनाडू राज्यामध्ये सुरुवातील कोरोणाग्रस्तांची संख्या नगण्य होती. मात्र, दिल्लीत पार पडलेल्या तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाला राज्यातील सुमारे दीड हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यातील अनेकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली. एकून 411 रुग्णांमधील 7 जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
देशभरामध्ये आत्तापर्यंत 1 हजार 301 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातीत 12 जणांचा काल(गुरुवार) दिवस भरात मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 336 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.