हैदराबाद-सध्याच्या दिवसात जिकडे पाहावे तिकडे, जणू हवेतही कोरोना आणि त्याविषयीचेच बोलणे सुरू आहे. नाही, आम्ही हे फक्त बोलण्यासाठी बोलले जाते, असे म्हणत नाही. कारण आता हे सिद्ध झाले आहे की कोरोना हा हवेतूनही पसरू शकतो. शास्त्रज्ञांनी घोषित केले आहे की, सार्स सीओव्ही २ विषाणूचा संसर्ग निरोगी व्यक्तीला होऊ शकतो.
कोरोना रुग्णाच्या तोंडातून बाहेर उडालेला अती सूक्ष्म थेंब हवेतून जाऊन निरोगी व्यक्तीला संसर्ग करू शकतो आणि म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, लोकांनी याबाबत जास्त काळजी घ्यायला हवी. हे सांगितल्यानंतर नागरिकांमध्ये जास्तच घबराट उडाली. त्यात दररोज देशात कोरोना संसर्गाची संख्या वाढतच आहे. हवेतून कोरोना संसर्ग म्हणजे काय? आणि ते कसे टाळायचे?
कोरोना विषाणू हा थोडा आकाराने मोठा आहे आणि ५ मायक्रॉन्सपेक्षा मोठ्या थेंबातून तो पसरतो. असे आपण आतापर्यंत समजत होतो. म्हणूनच लोक एकमेकांपासून अंतर राखून काळजी घेत असतात. पण नुकत्याच झालेल्या खुलाशानुसार तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या श्वाच्छोश्वासामधून हा विषाणू पसरतो हे समोर आले आहे आणि ती व्यक्ती अंतर ठेवून तुमच्याशी बोलली, तरीही संसर्ग होऊ शकतो. यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शक्यतो आपल्या लाळेचे मोठे थेंब हे जड असतात. त्यामुळे जमिनीवर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली लगेच पडतात. ते दोन मीटर अंतरापेक्षा जास्त जाण्याची क्षमता त्यांच्यात नसते. पण ५ मायक्रोन्सपेक्षा लहान आकार असलेला लाळेचा थेंब हा हलका असतो आणि तो हवेत बराच काळ तरंगत राहतो. अशा तरंगत असलेल्या थेंबाच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी श्वास घेतला तर मग त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा प्रकारे हवेतून संसर्ग होऊ शकतो. आणि अशा संसर्गाबद्दलच सध्या प्रचंड काळजी आहे. याचे कारण शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोना विषाणू हा थेंबातून पसरू शकतो आणि तो संसर्गजन्य असू शकतो.
गर्दीच्या ठिकाणी लोक संसर्ग झालेल्यांबरोबर जास्त काळ राहिले तर निरोगी व्यक्तीला कोरोना व्हायची शक्यता जास्त आहे. कारण हा विषाणू हवेतून पसरू शकतो. आणि जागतिक आरोग्य संघटनेने या म्हणण्याला दुजोरा दिला आहे, म्हणूनच लोकांमध्ये काळजी जास्त वाढली आहे. खरे तर अती सूक्ष्म थेंबातून कोरोना पसरतो, हे काही नवे नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते की, कोरोना रुग्ण उपचार घेत असतो, तेव्हा त्याची श्वाच्छोश्वासाची नलिका बदलली जाते किंवा ती नाकात घातली जाते तेव्हा रुग्णाच्या श्वासातून थेंब पसरून विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्याचा धोका जास्त असतो. पण आता हे फक्त रुग्णालयांपुरते मर्यादित राहिलेले नाही. नव्या खुलाशामुळे आता घरे, इमारती आणि कार्यालये इथे हवेचा झोत फार चांगला नसेल किंवा ठिकाण हवेशीर नसेल तर हा धोका वाढतो. चीन आणि अमेरिका इथे काही लोकांना कोरोना रुग्णांच्या संपर्कात न येताही कोरोना झाला. याचा अर्थ फक्त कोरोना रुग्ण शिंकला किंवा खोकला तरच हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो,असे अजिबात नाही. कोरोनाचे हवेत तरंगणारे थेंब हे ६ ते ९ फुटापर्यंत जाऊ शकतात. ते आजूबाजूच्या वस्तूंना जाऊन चिकटू शकतात. जर एखाद्याने अति सूक्ष्म थेंब असलेल्या ठिकाणी श्वास घेतला, त्यांनी तिथल्या वस्तूंना लावलेला हात नाक, डोळे आणि तोंडाला लावला तर विषाणू त्या व्यक्तीमध्ये जाऊ शकतो. तरीही यामुळे किती संसर्ग होऊ शकतो, हे नक्की माहीत नसले, तरी सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे.