नवी दिल्ली - देशामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण आढळल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. केरळमध्ये तीन रुग्ण आढळल्यानंतर आता पहिल्यांदाच केरळबाहेर दिल्ली आणि हैदराबाद शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.
या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना अलिप्त वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील एकजण इटली आणि दुसरा दुबईमधून नुकताच भारतात आला आहे. त्यामुळे आता इतर देशांमधून भारतात येताना कडक नियमावली लागू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांशी प्रशासन संपर्क साधत असून त्यांना अलिप्त राहण्यास सांगण्यात आले आहे. विमानातून येताना सहप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचीही माहिती घेतली जात आहे.
देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 'जागतिक स्तरावरील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. त्यानुसार सुरक्षेसाठी निर्बंध लावण्यात येतील', असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे.
इराण, इटली, चीन, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण आणि इटली देशांत प्रवास टाळण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.
राजस्थानमध्येही एक विषाणूबाधीत रुग्ण सापडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुणे येथील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' येथे रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत. इटली आणि इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या देशांतून भारताचे नागरिक स्वदेशी आणण्याच्या पर्यायांवर सरकार विचार करत आहे.