नवी दिल्ली -लॉकडाऊन काळात स्थलांतरित श्रमिकांना बस आणि ट्रेनच्या सहायाने त्यांच्या राज्यात पोहचविण्यात येत आहे. यावेळी सरकार रेल्वे प्रवास भाडे आकारत असल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. 'गरजू कामगारांना घरी परतण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्ष उचलेल', अशी घोषणा काँग्रेसने टि्वट करून केली आहे. रेल्वे मंत्रालयाकडे पीएम केअर फंडात जमा करायला १५१ कोटी रुपये आहेत, मात्र ज्यांच्या श्रमातून हा देश उभा राहातो त्या श्रमिकांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वे मंत्रालय तिकीट वसूल करत असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रेल्वे मंत्रालयावर निशाणा साधला आहे.
कामगार हे देशाचा कणा असून त्यांची मेहनत आणि त्याग हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे. केवळ चार तासांच्या सूचनेवर लॉकडाऊन झाल्यामुळे लाखो कामगार अडकले आहेत. 1947 च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच देशात हजारो कामगारांना शेकडो किलोमीटर चालून घरी परत जाण्यास भाग पाडण्यासारखे धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले आहे. त्यांच्याकडे रेशन नाही, पैसे नाहीत, औषधे नाहीत, साधन नाही. मात्र, घराकडे जाण्याची ओढ आहे. या कष्टकरी लोकांकडून अडचणीच्या वेळी भारत सरकार आणि रेल्वे मंत्रालय रेल्वे प्रवास भाडे आकारत आहे. ही दुःखद बाब आहे, असे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जारी केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.