नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस देशभर कार्यक्रम आयोजित करणार आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण काढली जाणार आहे.
येत्या 20 ऑगस्टला राजीव गांधी यांची जयंती आहे. काँग्रेस पक्ष येत्या 22 ऑगस्टला दिल्लीमधील इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजीत करणार आहे. ज्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय, प्रादेशीक, जिल्हा स्तरीय पदधिकारी सामील होतील.
या आठवड्यामध्ये आम्ही राजीव गांधीच्या 75 व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये स्मृती कार्यक्रम आयोजीत करणार आहोत. प्रत्येक दिवशी मी माझ्या वडिलांच्या उल्लेखनीय कामगिरीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. आज माहिती तंत्रज्ञान क्रांतीविषयी माहिती दिली आहे, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.