नवी दिल्ली :काँग्रेस आजपासून शेतकरी विधेयकांविरोधात देशव्यापी मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेमध्ये, तीन शेतकरी विधेयकांविरोधात देशभरातून दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस, राज्य प्रमुख आणि विशेष समीतीच्या एका बैठकीत याबाबत रणनिती आखण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस, राज्यांचे प्रमुख आणि काही वरिष्ठ नेते आज माध्यमांना संबोधित करतील. तसेच, २८ सप्टेंबरला शेतकरी विधेयकांविरोधात देशव्यापी आंदोलनही घेण्यात येईल. २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेस 'किसान-मजदूर बचाओ दिवस'चे आयोजन करणार आहे. देशभरातील जिल्हा मुख्यालये, आणि संसदेमध्ये धरणे आंदोलन आणि मोर्चे काढून हे आंदोलन करण्यात येईल. शेवटी, १४ नोव्हेंबरला दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली पत्रे काँग्रेस राष्ट्रपतींकडे सुपूर्द करेल, अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी दिली आहे.