नवी दिल्ली -कोरोनासारख्या गंभीर संकटाचाही भाजपा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूक हरण्याची भाजपाला भीती वाटत आहे त्यामुळेच ते इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत. तुम्ही इतके कसे अनैतिक वागू शकता की तुम्हाला कोरोनासारख्या संकटातही राजकीय फायदा घ्यावा वाटत आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी टीका केली आहे. बिहार निवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया बोलत होत्या. बिहारमधील सर्वांना आम्ही मोफत कोरोना लस देऊ, असे आश्वासन भाजपातर्फे देण्यात आले आहे.
बिहारमध्ये मोफत कोरोना लस देण्याच्या भाजपाच्या आश्वासनावर टीकेची झोड 'भाजपा बिहारमध्ये सत्तेत आली तर बिहारमधील लोकांना मोफत कोरोना लस मिळेल. मात्र, सत्तेत आले नाहीत तर बिहारमधील लोकांना मोफत लस देणार नाही का? किंवा इतर राज्यातील लोकांना मोफत लस मिळणार नाही का, असे सवालही सुप्रिया श्रीनाटे यांनी उपस्थित केले आहेत. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देऊ, असे आश्वासन निर्मला सीतारामण यांनी दिले आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपाच्या आश्वासनावर टीका केली आहे.
बिहारमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन खोटे - राहुल गांधी
भाजपाच्या कोरोना लसीच्या आश्वासनावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, कोरोनाविरोधात मोदी सरकारने रणनिती जाहीर केली आहे. राज्यानुसार निवडणुकांच्या तारखांचा तपशील पहा आणि त्यानंतर कोरोनाची लस कधी उपलब्ध होईल ते सांगा. तसेच हे दिलेले आश्वासन खोटे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
काय आहे जाहीरनाम्यात -
देशभरात कोरोनाचा प्रसार झाला असतानाही बिहार विधासनभेची निवडणूका होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज भाजपाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी त्या म्हणाल्या, एनडीए सरकार यशस्वीपणे कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाच्या अनेक लसींच्या विविध स्तरांवर चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर ज्या कोरोना लसीला परवानगी देईल, ती लस बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल. कोरोनाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात तिचे उत्पादन घेण्यात येईल. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत मिळणार असे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देणार का, याबाबत भाजपाने काहीही माहिती दिलेली नाही.