पाटणा- देवी दुर्गामातेच्या विसर्जनावेळी मुंगेर येथे झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या घटनेमुळे बिहारमधील नितीशकुमार सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. गोळीबाराच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्हाला जनरल डायरची आठवण झाल्याचे म्हणत काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.
बिहारमध्ये पूजा करणे हा गुन्हा आहे का? असा सवाल कॉंग्रेसने केला आहे. अशाप्रकारे देवीच्या भक्तांना पळवून त्यांना मारहाण करून गोळ्या घालण्याचे काय कारण होते? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असे काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. हिंसाचाराबद्दल त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले की, नितीशकुमार स्वत: ला 'सुशासन बाबू' म्हणवून घेत असले तरी, प्रत्यक्षात मात्र ते 'निर्दयी कुमार' आहेत. हजारो संवेदनांच्या निधनानंतर असे निर्लज्ज आणि निर्दयी सरकार जन्माला येते, आता यांना निरोप देण्याची वेळ आली आहे.