नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पक्षात अनेक बदल केले आहेत. यात गुलाम नबी आझादांसह पक्षातील ४ वरिष्ठ नेत्यांना पक्षाच्या महासचिव पदाच्या जबाबदारीमधून मुक्त करण्यात आले आहे. यासोबतच काँग्रेस कृती समितीचीही पुन:स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेस कृती समितीमध्ये आता २२ सदस्य असणार आहेत.
पक्षाचे संगठन महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी आणि मल्लिकार्जुन खडगे यांना पक्षाच्या महासचिव पदावरून मुक्त करण्यात आले आहे. संगठने बदल करण्यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहीणाऱ्या २३ नेत्यांमधील आझादांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे आझाद यांना काँग्रेस कृती समितीत स्थान देण्यात आले आहे. ही समिती सोनिया गांधी यांना पक्षातील महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे. या समितीमध्ये एके एंटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. यासह सुरजेवाला आणि तारिक अनवर यांना पक्षाचे महासचिव नियुक्त करण्यात आले आहे.