नवी दिल्ली - चीन बरोबरच्या सीमा वादानंतर काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाच्या चीन भेटीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच देशातील सीमा सुरक्षा आणि कोरोना संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणीही काँग्रेसने केली.
इंडिया फाउंडेशन या देशांना भेटी का देत आहे? ते का भेटतात? भेटींचे काय परिणाम आहेत? यामध्ये अजित डोवाल यांचा मुलगा शौर्य डोवाल यांची काय भूमिका आहे? या सभांना ते उपस्थित राहतात काय ?, असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केले.
2009 ते 11 च्या दरम्यान भाजप प्रतिनिधींनी चीनला दिलेल्या भेटीवरही काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाष्य केले. "कम्युनिस्ट पक्ष आणि भाजपमधील संबंध मजबूत करण्यासाठी भाजप चीनला प्रतिनिधीमंडळ पाठवत आहे का ? या सर्वांमधून देशाचा काय फायदा झाला ? सीमा का असुरक्षित का आहे?, असे प्रश्न खेरा यांनी उपस्थित केले.
केंद्र सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खेरा यांनी केली. ते म्हणाले की, संसदीय समितीची बैठकही या संकटावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली नाही. 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यात जेव्हा युद्ध झाले होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मागणीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र, आज संसदेचे अधिवेशन भरवले जात नसून विरोधी पक्षाचे म्हणणेही ऐकले जात नाही. रोजगाराचा मुद्दा असो, विकासाचा मुद्दा असो किंवा चीनबद्दल वाद असो, मोदी सरकार सतत सत्य लपवत आले आहे, असा आरोपही खेरा यांनी केला.