नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली. "मी त्यांच्यावर (राहुल गांधींवर) इतक्यावेळा पासून बोलत आहे. मात्र, त्यांना हे आता कळाले, काही अशाच ट्यूबलाइट्स असतात', असे मोदी म्हणाले. त्यावर काँग्रेसने टि्वट करुन मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसने टि्वटकरून मोदींवर निशाणा साधला. 'द्वेषाच्या आगीत जळत असलेल्या लाल बल्ब हा प्रेमाचा प्रकाश पसरवणाऱ्या शांत ट्यूबलाइटला घाबरतोच. प्रत्येकाला घाबरवण्याचा विचार करणाऱ्यांची ही भीती साहजिकच आहे', असे काँग्रेसने टि्वट करुन म्हटले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार दरम्यान एका सभेत मोदींवर टीका केली होती. तरुण-तरुणी सहा महिन्यांत त्यांना काठ्यांनी मारतील, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.