नवी दिल्ली - संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी संसदेमध्ये कोरोना, अर्थव्यवस्था, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच मोदींनी देशातील जनतेला दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनावरुन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 'हम यह नही कहते महामारी नही थी, हम यह बता रहे है तयारी नही थी, तयारी से लढते तो हालात ना होते, रेल की पटरी पर वो प्रवासी ना सोते', या कवितेद्वारे त्यांनी लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सामना केलेल्या संकटाचा उल्लेख करत, मोदींवर निशाणा साधला.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण सक्षम ठरलो नाही. कोरोचा प्रसार वाढत गेला. तर अर्थव्यवस्था कोसळली. लॉकडाऊनमध्ये लाखो युवक बेरोजगार झाले. घर घर में अधेंरा है, कही बहार नही है. बैठे है युवा खाली, रोजगार नही है, या शायरीतून त्यांनी बेरोजगारांचे दु:ख मांडले. तसेच गेल्या 41 वर्षात प्रथमच जीडीपी इतका रसातळाला गेल्याचे ते म्हणाले.