नवी दिल्ली -काँग्रेस पक्षाचे नेत राहुल गांधींनी एका सभेला संबोधित करत असताना भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले होते. त्यावरून आज सभागृहात गदारोळ झाला असून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली. त्यावर मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
माझ्याकडे एक क्लिप आहे ज्यामध्ये मोदींनी दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हटले होते. मी तो व्हिडिओ टि्वट केला आहे. फक्त ईशान्य भारतामधील आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी भाजपने हा मुद्दा बनविला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि झारखंडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज लोकसभेत उमटले. वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उतरले होते. राहुल गांधींच्या वक्तव्याने फक्त माझ्यावरच नाही तर संपूर्ण देशावर आघात झाला आहे. त्यांनी संसदेचीच नाही, तर संपूर्ण देशाची माफी मागावी, असे केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. सभागृहात गदारोळ सुरू होताच लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
काय म्हणाले होते राहुल गांधी-
वायनाडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी आहे, असे म्हटले होते. तर झारखंडमध्ये त्यांनी भारत 'मेक इन इंडिया' नाही तर रेप इन इंडिया झाला आहे, असे वक्तव्य केले होते. उत्तरप्रदेशात भाजपचा आमदार बलात्कार करतो, त्यानंतर पीडितेचा अपघात होतो. मात्र, मोदी यावर काहीही बोलत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते. नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ. मात्र, मोदी हे सांगत नाहीत की, बेटींचा कोणापासून बचाव करायचा आहे. तर देशातील मुलींचा भाजपच्या आमदारांपासून बचाव करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.