श्रीनगर- काँग्रेसचे खासदार आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना जम्मू विमानतळावर आज (मंगळवार) दुपारी अडवण्यात आले आहे. तेथून त्यांना परत दिल्लाला माघारी पाठवण्यात आले. त्यामुळे आझाद यांनी संताप व्यक्त केला. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे ते म्हणाले.
हे लोकशाहीसाठी चांगले नाही. जर प्रमुख राजकीय पक्षांना काश्मीरला भेट देऊ दिली जात नसेल तर कोण तेथे जाईल? आधीच काश्मीरच्या ३ माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर मला तेथे जाऊ दिले जात नाही. यातून असहिष्णुता वाढत असल्याचे म्हणत गुलाम नबी आझाद यांनी नाराजी व्यक्त केली.
३७० कलम रद्द केल्यानंतर आणि काश्मीरचे २ केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर राज्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हळूहळू राज्यामधील स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
काही जिल्ह्यांमधील सचारबंदीवरील निर्बंध उठवण्यात आले आहे. मात्र, संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोबाईल इंटरनेट सेवा अंशतहा सुरू करण्यात आली होती. मात्र, अफवा पसरु नये म्हणून पुन्हा बंद करण्यात आली.