नवी दिल्ली -नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीवरून देशभरातील वातावरण तापले आहे. राजकीय वर्तुळातील सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांची बैठक होत आहे. यातून विरोधकांची एकता दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पक्षही बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
बंगालमध्ये नागरिकत्व कायद्यावरून चांगलेच रण पेटलेले आहे. तृणमूल काँग्रेस आणि डाव्या संघटनांमध्ये काल (रविवारी) चकमक झाली. चकमकीनंतर मला विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. 'सीएए' आणि 'एनआरसी'विरोधात आंदोलनाची मोहिम छेडणारी मी पहिली व्यक्ती आहे. मात्र, काँग्रेस आणि डावे नागरिकत्व कायद्याच्या नावाखाली आंदोलन नाही तर केवळ विध्वंस घालत आहेत, अशी टीका ममता यांनी केली आहे.
राजस्थानमधील कोटा येथील रुग्णालयात झालेल्या चिमुकल्या मुलांच्या मृत्यूवरून मायावती यांनी काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीकेची राळ उठवली होती. 'काँग्रेसच्या महिला सरचिटणीस जर कोटा येथील स्वत:चे बाळ गमावलेल्या आईंना भेटत नसतील तर त्यांनी उत्तर प्रदेशातील पीडितांची घेतलेली भेट केवळ राजकीय नाटक ठरते', अशा शब्दांत मायावती यांनी हल्लाबोल केला.
काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी नागरिकत्व कायद्यावरून वारंवार केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. हा कायदा जाती-धर्मावरून माणसांमध्ये भेद करणारा असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने तत्काळ सीएए कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने १० जानेवारी रोजी नागरिकत्व कायदा (CAA) देशभरात लागू झाला असल्याचे परिपत्रक जारी केले आहे. यानंतर पश्चिम बंगाल आणि काँग्रेसशासित राज्यांनी हा कायदा आमच्या राज्यात लागू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.