नवी दिल्ली -राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी समितीची उद्या (सोमवार) बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. काँग्रेस कार्यकारिणी समिती, खासदार, माजी केंद्रीय मंत्र्यांनी मिळून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले असून पक्षांतर्गत काही बदलांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. उद्या (सोमवारी) होणारी बैठक ही व्हर्चुअल असून 'वेबएक्स'वर घेतली जाणार आहे. व्हिडिओ लीक किंवा हॅकिंगचा धोका टाळण्यासाठी बैठकीच्या काही काळ अगोदर नेत्यांना बैठकीचा आयडी दिला जाणार आहे.
काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात पक्षातील अस्थिरता आणि फुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पक्षाला प्रभावी आत्मपरिक्षणाची आवश्यकता आहे. पक्षाला पूर्णवेळ कृतीशील आणि प्रभावी नेतृत्वाची गरज निर्माण झाली असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधींना लिहिलेले पत्र हा पक्षाचा अंतर्गत मुद्दा असून बैठकी अगोदर त्यातील तपशील उघड करता येणार नाही, असे काँग्रेसच्या एका माजी खासदाराने सांगितले.