नवी दिल्ली - सध्या देशभरात परीक्षांबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे. काही ठिकाणी परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी पयत्न सुरू आहेत. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मागील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सरासरी गुण देऊन पुढील वर्गात ढकलण्यात आले आहे. संबंधित प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलंय.
आयआयटीने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र अद्याप यूनिव्हर्सिटी ग्रान्ट कमिशन (यूजीसी) या प्रकरणावर संभ्रम निर्माण करत आहे. यूजीसीनेदेखील मागील परीक्षांच्या सरासरीचे गुण देऊन विद्यार्थ्यांना पास करायला हवे, अशी भूमिका राहूल गांधी यांनी मांडली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे परीक्षांबाबतची सरकाची भूमिका स्पष्ट होण्यास वेळ लागतोय. त्यातच विद्यार्थी आणि पालक यांच्या मुद्द्यांचा देखील विचार व्हायला हवा, अशी भूमिका वेळोवेळी पुढे आलीय. यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांचं काय, हा प्रश्न कायम होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच यूजीसीने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दर्शवला. यामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्सचे पालन करुन परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली. यासंदर्भात कार्यपद्धती देखील जाहीर करण्यात आली.