नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. "किमान शासन, कमाल खासगीकरण ही मोदी सरकारची विचारसरणी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
'कोरोना फक्त एक निमित्त आहे. सरकारी कार्यालयांना कर्मचारी मुक्त करायचंय. तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करायचंय आणि मित्रांनाच पुढं घेऊन जायचंय' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. #SpeakUp बोलते व्हा, असा हॅशटॅग लिहत त्यांनी ट्विट केले आहे. सोबतच त्यांनी एका वृत्तपत्रातील बातमीही शेअर केली आहे.
एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर उणे २३.९ टक्के झाला आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी टाळेबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
काल सुद्धा राहुल गांधी यांनी ट्विटवरून मोदींवर निशाणा साधला होता.' 12 कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था गायब, सामान्य व्यक्तीचं उत्पन्न गायब, देशातील आनंद आणि सुरक्षा गायब, प्रश्न विचारला तर उत्तर गायब', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 'विकास गायब है' असा हॅशटॅग त्यांनी टाकला होता.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही पंतप्रधान मोदींना ट्विट करून प्रश्न विचारला होता. 'जीडीपी उणे २३.९ टक्के. मोदींजी तुम्हाला आठवतयं का? 'अच्छे दिन', सब का साथ सबका विकास, तुम्ही काँग्रेला साठ वर्ष दिली मला फक्त ६० महिने द्या, आता पकोडे तळायची वेळ आली आहे, ते सुद्धा विकले जाणार नाहीत. फक्त भाषण आणि झिरो शासन' असे कपिल सिब्बल यांनी म्हटले होते.