नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्के झाला आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाचा प्रसार, चिनी आक्रमण आणि कमी होणाऱ्या गुंतवणुकीमुळे विकास दर मागील चार दशकांत पहिल्यांदाच उणे झाला आहे. यावरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोदींचं २०१३ मधील एक जुनं ट्विट शेअर करत मलाही आदणीय पंतप्रधान मोदींना हेच सांगायच आहे, असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी २०१३ मध्ये काय केलं होत ट्विट
पंतप्रधान मोदींनी ३० नोव्हेंबर २०१३ साली केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना एक ट्विट केले होते. या ट्विटमधून मोदींनी रोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला होता. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते की, 'अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. शुल्लक राजकाणाकडे लक्ष देण्यापेक्षा अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या. चिदंबरम जी तुमच्या हातातील कामाकडे लक्ष द्या, असे ट्विट मोदींनी केले होते. त्यावरून चिदंबरम यांना मोदींना हाच सल्ला मला तुम्हाला आता द्यायचा असल्याचे म्हटले आहे.
कोरोना संकट येण्याच्यापूर्वीच देशाची अर्थव्यवस्था मंदीत सापडली होती. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली. त्यातच लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अनेक क्षेत्रांचा विकास दर खाली आला. उद्योगधंदे बंद असल्याने उत्पादन क्षेत्रासह पर्यटन, सेवा, बँकिंग, निर्मिती, आयात निर्यात, कृषी, मनोरंजण सर्वच क्षेत्रे डबघाईला आली आहेत. मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. मात्र, त्यानंतरही अर्थव्यवस्थेच सुधारणा झाली नाही.