नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी टीका केली आहे. आरएसएसची शिक्षा आणि दिक्षा वेगवेळगळ्या लोकांच्या मुलांना वेगळेगळी असते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
'RSS ची शिक्षा दिक्षा नेत्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलांना वेगवेगळी' - RSS news
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो शेअर करत अमित शाह आणि आसएसएसवर टीका केली आहे.
ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, 'सध्या आयपीएल सुरू असल्याने अमित शाह यांचे पुत्र जय शाह संयुक्त अरब अमिरातेत (युएई) आहेत. आयपीएलचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आरएसएसची शिक्षा आणि दिक्षा वेगवेळगळ्या लोकांच्या मुलांसाठी वेगळेगळी असते. भाजप नेत्यांनी मुले सुटाबुटात विदेशात, तर सामान्य जनतेच्या मुलांच्या हातात तलवार, काठी आणि पिस्तुल देऊन हिंसा आणि तिरस्काराची शिकवण, असे त्यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत जय शाह युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलचा सामना पाहताना दिसत आहेत, त्यांच्या शेजारी अरबी लोकसुद्धा बसलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत संघाच्या गणवेशातील लहान मुले दाखविण्यात आली आहेत. त्यांच्या हातात काठ्या आणि शस्त्रे आहेत.