नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल (मंगळवार) राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला तर, महागठबंधनमध्येही जागावाटप झाले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यावरुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ओवेसी यांना टोला लगावला आहे.
'राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसच्या महागठबंधनला नुकसान पोहचविण्यासाठी ओेवेसी भाजपाच्या सांगण्यावरून बिहार निवडणूक लढत आहेत. भाजपा आणि ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे', असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. बिहार निवडणूक लढण्याचे अधिकृत पत्रक एमआयएमने जारी केल्यानंतर सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.