नवी दिल्ली - देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यामध्ये गांधी कुटुंबीयांचाही समावेश होता. मात्र, त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यावर सोनिया गांधी यांनी एसपीजी प्रमुख अरुण सिन्हा यांना पत्र लिहून आतापर्यंत सुरक्षा प्रदान केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
मी माझ्या पूर्ण परिवाराकडून एसपीजी सुरक्षेचे आभार व्यक्त करत आहे. गेल्या 28 वर्षांपासून एसपीजीने आमची सुरक्षा केली. समर्पण, विवेकबुद्धीने आमची काळजी घेतल्याबद्दल मी पूर्ण कुटुंबाच्यावतीने मनापासून कौतुक व कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो', असे सोनिया गांधींनी पत्रामध्ये म्हटले आहे.
एसपीजीच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम केले. तुम्ही दिलेल समर्थन आणि आपुलकीसाठी आभार, असे टि्वट राहुल यांनी केले आहे.
कशी असते एसपीजी सुरक्षा?
एसपीजी सुरक्षा व्यवस्थेद्वारे अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला देण्यात येते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांकडे स्नायपर्स, बॉम्ब डिस्पोज करणारे तज्ज्ञ, असतात. एसपीजी मधील कमांडोना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले असते. तसेच त्यांच्याकडे आत्याधुनिक शस्त्रे असतात. एसपीजी सुरक्षा असणाऱ्या ताफ्यातील वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असते.
कधीपासून सुरू झाली एसपीजी सुरक्षा?
व्यवस्था पंतप्रधान इंदिरा गांधींची १९८४ साली हत्या झाल्यानंतर १९८५ साली एसपीजी सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आली. व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर १९८९ मध्ये राजीव गांधी यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था सरकारने काढून घेतली होती. मात्र, १९९१ साली राजीव गांधीची हत्या करण्यात आली. त्यानंतर १९९१ मध्ये एसपीजी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार माजी पंतप्रधान आणि कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना कमीत कमी २० वर्षे एसपीजी सुरक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. २००३ साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर एसपीजी कायद्यामध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली. त्यानंतर माजी पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था राजीनामा दिल्यानंतर एक वर्षानंतर आपोआप संपुष्टात येईल, अशी तरतूद करण्यात आली. तसेच एखाद्या व्यक्तीला असलेला धोका पाहून सुरक्षा किती दिवस ठेवायचा हा निर्णय घेण्यात आला.