नवी दिल्ली - काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार धोक्यात आले आहे. बंडखोर नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात येत आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काँग्रेस पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत माहिती काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांची हकालपट्टी करण्यास मंजूरी दिल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.
मागील १८ वर्षांपासून काँग्रेसचा मी सदस्य होतो. मात्र, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मागील एक वर्षांपासून घडलेल्या घडामोडीनंतर मी हा निर्णय घेतला आहे. लोकांच्या, राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी काम करत राहणे, हा माझा पहिल्यापासूनच उद्देश आहे. या ध्येयात काही बदल होणार नाही. मात्र, काँग्रेस पक्षात राहून मला काम करणं शक्य होत नाही. लोकांच्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. काँग्रेस पक्ष आणि नेत्यांनी दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद, असे जोतिरादित्य सिंधिया यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.