नवी दिल्ली - राजधानीमध्ये झालेला हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि दिल्ली सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आणि अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनामा द्यावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. तर दिल्ली हिंसाचार देशाला खाली मान घालायला लावणारी घटना असल्याचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेत मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिले. मागील चार दिवसांमध्ये जे काही देशामध्ये घडले, ते चिंताजनक असल्याचे ते चिंताजनक असून देशाला मान खाली घालायला लावणारी घटना आहे. आत्तार्यंत ३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० नागरिक जखमी झाले आहेत. यातून केंद्र सरकारचे अपयश दिसून येत असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.
नागरिकांचे स्वातंत्र्य, मालमत्ता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रपतींनी आश्वस्त करावे. तसेच हिंसाचार रोखण्यास अपयशी झाल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सोनिया गांधींनी राष्ट्रपतींकडे केली. यावेळी पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अॅन्टोनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दिल्ली हिंसाचारात आत्तापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. जाळपोळीमध्ये खासगी तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी १८ गुन्हे दाखल करत १०० पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कडेकोट बंदोबस्त संवेदनशील भागांमध्ये ठेवण्यात आला आहे. सीएए समर्थक आणि सीएएला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी हिंसाचार पसरला होता. तीन दिवसांनंतर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास यश आले आहे.