नवी दिल्ली -भाजप नेते आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेसवर टीका केली. घराणेशाहीत अडकलेल्या काँग्रेसला सहिष्णू आणि सलोखापूर्ण भारत देश दिसणार नाही, अशी टीका नक्वी यांनी केली. भारताला एका राजकीय घराणेशाही जपणाऱ्या पक्षाकडून किंवा त्या पक्षातील व्यक्तीकडून कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असेही ते म्हणाले. शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी निकोलस बर्न्स यांच्याशी चर्चा करताना, भारत आणि अमेरिका या देशांतील नागरिकांच्या जनुकात सहिष्णूता आहे, मात्र, सध्या ती लोप पावत चालल्याचे म्हटलं होतं.
भारतातील सहिष्णुतेचे डीएनए लोप पावल्याचे ज्ञान पाजळणाऱ्या काँग्रेसच्या अज्ञानी लोकांना हे समजून घ्यावे लागेल की, "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया:", सनातन संस्कृती आणि संस्कार हाच भारताचा डीएनए होता आणि राहील. देशाला आपली संस्कृती, मूल्ये, सहिष्णूता दाखविण्यासाठी कोणत्याही राजकीय ढोंगीपणाच्या प्रयोगशाळेतील प्रमाणपत्राची गरज नाही. भारताच्या याच संस्कृतीने इतक्या मोठ्या देशाला "विविधतेत एकता" या सूत्रात बांधले आहे, असे नक्वी म्हणाले.