नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काही स्थलांतरीत मजुरांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या मजुरांना ताब्यात घेतले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
राहुल गांधींच्या भेटीनंतर मजुरांना ताब्यात घेतले गेले; काँग्रेसचा आरोप.. दिल्लीच्या सुखदेव विहार फ्लायओव्हर परिसरामध्ये असलेल्या काही स्थानिक मजुरांना राहुल गांधी यांनी आज भेट दिली. हे मजूर पायीच आपल्या घराकडे निघाले होते. यावेळी राहुल यांनी त्यांच्याशी चर्चा केली, तसेच त्यांच्या घरी जाण्यासाठी काही व्यवस्था करण्याचेही आश्वासन त्यांना दिले.
यानंतर जेव्हा गांधी तेथून गेले, तेव्हा पोलिसांनी 'वरून' मिळालेल्या आदेशानुसार या मजुरांना ताब्यात घेतले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षातर्फे या मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नियमानुसार जास्त मजुरांना एकत्र प्रवास करणे बेकायदेशीर होते. त्यामुळे पक्षाने नंतर आणखी काही लहान गाड्यांची व्यवस्था करत या मजुरांच्या घरी जाण्याची सोय केली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत कोणीतरी चुकीची माहिती पसरवत आहे, काँग्रेस कार्यकर्ते परिसरातून गेल्यानंतरही कित्येक मजूर तिथेच होते. पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :मजूरांना कर्ज नको थेट पैसे द्या - राहुल गांधींची मागणी