पणजी- गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, असे काँग्रेसकडून पत्रात म्हटले आहे.गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने विधानसभेतही हजेरी लावली होती. आता काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता गोव्यात काय राजकीय घडामोडी होतील याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. गोव्यात भाजप सरकार चालवण्यास सक्षम नाही. शिवाय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. फ्रांसिस डिसूजा यांच्या मृत्यूनंतर गोव्यात भाजपकडे १३ आमदार असून आमच्याकडे १४ आमदार आहेत. आमचा पक्ष राज्यात सर्वात मोठा असल्याने आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी,असे काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.