नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जीडीपी घसरणवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक विकासदर हा ४ टक्क्यांहून कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्याहून अधिक वाईट घसरून विकासदर ३.१ राहिला आहे. सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमाबद्दल स्पष्टीकरण देण्याबरोबरच नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील 'अपयश' स्वीकारले पाहिजे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.
जीडीपीची जाहीर झालेली आकडेवारी म्हणजे सरकारने केलेल्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे समालोचन आहे. तसेच ही आकडेवारी लॉकडाऊनच्या पूर्वीची आहे. केवळ शेवटच्या सात दिवसात लॉकडाऊन होते. आपल्या देशात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ होण्यापूर्वीच अर्थव्यवस्था ढासाळली होती, असेही ते म्हणाले.