नवी दिल्ली -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अधिकृतरित्या ट्विटरवरून घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रमुख टक्कर होणार असून आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही मोट बांधली आहे.
हाय कमांडकडून हिरवा कंदील
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्याच्या प्रस्तावास काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंजूरी दिली आहे, असे ट्विट अधीर रंजन चौधरी यांनी केले आहे. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगालमधील काँग्रेस नेत्यांशी आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली होती. तसेच डाव्या पक्षांशी युती करण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. दोन्ही पक्षांमध्ये जागांचे वाटप कसे असेल, याचीही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रतिष्ठेची निवडणूक
डाव्यांसोबत जागावाटपाबाबत काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचे मत वेगळे असल्याची माहिती मिळत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल विधानसभा निवडणुका अनेक अर्थाने प्रतिष्ठीत बनली आहेत. बंगालमधून तृणमूल सरकार आणि ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी बंगाल दौरा करून निवडणुकीच्या आधी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.