गांधीनगर - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर मोठ्या उत्साहात 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यावर किती खर्च झाला यावरून टीका होत आहे. याला मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी उत्तर दिले आहे.
ट्रम्प यांच्या तीन तासाच्या अहमदाबाद दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च झाल्याची टीका होत आहे. मात्र, १०० कोटी नाही तर साडेबारा कोटी रुपये खर्च झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने या दौऱ्यासाठी ८ कोटी रुपये मंजूर केले होते तर अहमदाबाद महानगरपालिकेने ४.५ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, १०० कोटींचा आकडा कोठून आला हे मला समजत नाही, असे मुख्यमंत्री रुपानी म्हणाले.
विरोधी पक्ष काँग्रेसने ट्रम्प दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा गुजरात विधानसभेत केला होता. गुजरात सरकारने ट्रम्प यांच्या तीन तासाच्या अहमदाबाद दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च केल्याचे ट्विट काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी केले होते.