नवी दिल्ली -काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने नवीन अध्यक्षाच्या निवडीची तयारी सुरू केली आहे. मधुसुदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आपले काम सुरू केले आहे. मिस्त्री यांनी सर्व राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अ. भा. काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) सदस्यांची नावे पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. हे सदस्य मतदानासाठी पात्र आहेत की नाही, हे तपासले जाणार आहे.
मिस्त्री यांनी एक पत्रक काढून सर्व प्रदेशाध्यक्षांना लिहिले आहे की, 'एआयसीसी लवकरात लवकर बैठक बोलवणार आहे. त्यामुळे एआयसीसीच्या सदस्यांची नावे आणि फोटो केंद्रात पाठवण्यात यावी. त्यानंतर त्यांना बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ओळखपत्रे दिली जातील. बैठकीचे ठिकाण आणि दिवस लवकरच सांगितले जाईल.'
वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिले होते पत्र -
काँग्रेसला पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, आणि संघटनात्मक पातळीवर सुधारणा हव्यात, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिले होते. यासंदर्भात २४ ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षातील नेतृत्त्वावर टीका करणाऱ्या नेत्यांनी, आपण केवळ पक्षासमोरील आव्हाने समोर यावीत, त्यांच्यावर लक्ष जावे, यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचे स्पष्ट केले. यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधीच पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असतील, असा निर्णय घेण्यात आला होता.
राहुल यांनीच घ्यावीत सूत्रे हातात -
१९९८मध्ये सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्षा होण्याआधी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि त्यांचे उत्तराधिकारी सीताराम केसरी यांनी हे पद भूषवले होते. योगायोगाने म्हणा किंवा ठरवून म्हणा सोनिया गांधी यांची १९ वर्षे काँग्रेसचा कारभार पाहिल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. राहुल गांधींच्या पुनरागमनाची चर्चा काँग्रेस वर्तुळातवर्षभरसुरू असली तरीही पूर्णवेळ अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी ते तयार आहे का, याची कुठेच स्पष्टता नाही. मात्र, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी केली होती. यापूर्वीही अनेक काँग्रेस नेत्यांनी उघडपणे राहुल गांधींना समर्थन दिले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.