महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर'नाटक': कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

१५ आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर कुमारस्वामी सरकारची नाव बुडणार की तरणार हे आजही स्पष्ट झाले नाही. विधानसभेचे आजचे कामकाज संपले आहे. उद्या ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार आहे. आता राज्यापालांनी कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

कुमारस्वामी सरकारची आज परीक्षा

By

Published : Jul 18, 2019, 7:44 AM IST

Updated : Jul 18, 2019, 10:07 PM IST

बंगळुरू- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आजही काही निकाल निघाला नाही. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. १५ आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर कुमारस्वामी सरकारची नाव बुडणार की, तरणार हे आज विश्वासदर्शक ठरावानंतरच स्पष्ट होणार होते. मात्र, आता राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना उद्या शुक्रवारी दुपारी दीड वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

बी. एस येदीयुरप्पा पत्रकारांशी बोलताना

UPDATE'S -

  • राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
  • बहुमत चाचणी न झाल्यामुळे आजची रात्र विधानसभा हॉलमध्ये काढण्याचा भाजप आमदारांचा निर्णय
  • विधानसभेचे आजचे कामकाज संपले. उद्या ११ वाजता सुरू होणार कामकाज.
  • बहुमत कधी सिद्ध करावे, हे सांगणे राज्यपालांचे काम नाही, विधानसभा अध्यक्ष के. आर रमेश यांचे स्पष्टीकरण.
  • विधानसभेत आजच मतदान घ्या आणि बहुमत सिद्ध करा, राज्यपाल वजुभाई वाला यांचे विधानसभा अध्यक्ष के. आर रमेश यांना पत्र
  • विधानसभा अध्यक्ष के. आर रमेश यांनी ३० मिनिटांसाठी कार्यवाही स्थगित केली.
  • सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लागू झाला किंवा आमचा काढलेला व्हिप कामात आला तरीही दोन्ही बाजूंनी आमच्या सरकारवर संकट कायम आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आधी दिलेल्या आदेशाबाबत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणं राज्यघटनेच्या विरोधात ठरेल - काँग्रेस नेत सिद्धरामय्या
  • बंगळुरातील विन्डफ्लॉवर रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असलेले काँग्रेसचे बंडखोर आमदार श्रीमंत पाटील यांची प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल. रात्रीतून मुंबईला झाले रवाना.
  • काँग्रेस नेते सिद्धारामय्यांचे भाषण सुरु, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींवर मत व्यक्त करत आहेत.
  • एन. महेश - बहुजन समाज पक्ष (बीएसपी) आमदार विश्वासदर्शक ठरावाला गैरहजर
  • बंडखोर आमदार भाजपच्या मदतीनं सर्वोच्च न्यायालयात गेले - मुख्यमंत्री
  • फक्त सरकार चालवता येत नाही म्हणून मी येथे आलो नाही, तर काही आमदारांमुळे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार धोक्यात आले आहेत - मुख्यमंत्री कुमारस्वामी
  • विधानसभेत एच. डी कुमारस्वामी यांचे भाषण सुरु.
  • कर्नाटक विधानसभेत थोड्याच वेळात विश्वासदर्शक ठराव मांडणार
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विधानभवनात दाखल
  • आम्हाला १०० टक्के खात्री आहे, काँग्रेस जेडीएसचे आमदार १०० पेक्षा कमी आहेत, तर आमचे १०५ आहेत. विश्वासदर्शक ठरावात त्यांचा नक्कीच पराभव करु - बी. एस येदीयुरप्पा
  • काँग्रेस नेते सिद्धारामय्या विधानभवनात दाखल.
  • कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. एस येदीयुरप्पा आणि भाजप आमदार विधानभवनात दाखल.

विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ पासून चर्चा सुरू झाली होती. ३ बंडखोर आमदारांसह जेडीएसच्या ३७ जणांना कुमारस्वामींनी विधानसभेत हजर राहण्याचा आदेश (व्हीप) जारी केला आहे. आमदार नारायण गौडा, गोपीनाथ आणि एच. विश्वनाथ या तिघांचा यात समावेश आहे. राजीनामे दिल्यामुळे १५ आमदार हजर राहिले नाहीत.

विश्वासदर्शक ठरावाला हजर न राहिल्यास किंवा पक्ष आदेशाच्या विरुद्ध मतदान केल्यास कारवाई करण्याची सक्त ताकीद कुमारस्वामी यांनी दिली होती. यामध्ये पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचेही संकेत त्यांनी दिले होते.

दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटक सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे स्पष्ट केले होते. १५ बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावास येण्याची सक्ती करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांना राजीनाम्यावर ठराविक वेळेत निर्णय घेण्यासाठी बळजबरी करता येणार नाही, असेही न्यायालयाने निर्णय घेताना म्हटले आहे.

१३ महिन्यांचे काँग्रेस- जेडीएस सरकार १५ आमदारांच्या राजीनाम्यानंतर अडचणीत आले आहे. राज्याच्या विधानभेमध्ये २२५ सदस्य आहेत. यामध्ये एका नामनिर्देशित सदस्याचा समावेश आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षाला ११३ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

Last Updated : Jul 18, 2019, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details