पणजी -केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभाग (डीपीआयआयटी) आणि गोवा सरकारच्या सहकार्याने दुसऱ्या 'स्टार्ट अप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट'चे आयोजन करण्यात आले होते. "अशी परिषद फार महत्तवाची असते. त्यानिमित्ताने गुंतवणूकदार, नियामक आणि धोरणकर्ते यांच्यामध्ये संपर्क साधला जातो. स्टार्ट अपमध्ये भारत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे असे संवाद होणे अनिवार्य आहे", असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिषदेच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा केली. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना गोव्याची संस्कृती, कार्यपद्धती आणि पायाभूत सुविधांची ओळख होईल, असे ते यावेळी म्हणाले. डीपीआयआयटीचे सचिव डॉ. गुरुप्रसाद महापात्रा यांनी परिषदेची संकल्पना विशद केली. स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय बाजारपेठ अतिशय योग्य असल्याचे डॉ. महापात्रा म्हणाले. सरकारने स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी बरेच नियमन अडथळे दूर केले आहेत. तसेच सरकारने राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.