झारखंडमधील सरायकेलात माओवाद्यांचा हल्ला, आयईडी स्फोट केल्याने अनेक जवान जखमी - attack
जवानांना चॉपर हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारांसाठी पाठवण्यात येत आहे. माओवाद्यांशी अद्याप चकमक सुरू आहे. याच भागात निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता.
रांची - झारखंडमधील सरायकेला खरसावा येथे माओवाद्यांनी सकाळीच पोलिसांवर हल्ला केला. माओवाद्यांनी येथे आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात कोब्राच्या ८ जवानांसह एकूण ११ जवान जखमी झाले. या जवानांना चॉपर हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारांसाठी पाठवण्यात येत आहे. माओवाद्यांशी अद्याप चकमक सुरू आहे. याच भागात निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता.
माओवाद्यांचा म्होरक्या नंबला केशवराव याने याच भागात घेतली बैठक
भाकप माओवाद्यांचा म्होरक्या नंबला केशवराव उर्फ बसवाराज झारखंडमधील माओवादी संघटन अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने सरायकेला-खरसावा या भागांमध्ये बैठकी घेतल्या आहेत. बसवाराज याची जबाबदारी पतिराम मांझी उर्फ अनल याला दिली आहे. मांझी यांच्या डोक्यावर २५ लाखांचे बक्षीस आहे. माओवाद्यांच्या मिलिटरी कमिशनमध्ये त्याला बढती देण्यात आली आहे. मांझी सध्या महाराज प्रमाणिक आणि अमित मुंडा यांच्यासह या परिसरात तळ ठोकून आहे. प्रमाणिक याच्यावर १५ लाख आणि मुंडा याच्यावर १० लाखांचे पारितोषिक आहे. याच माओवादी टोळक्याद्वारे या भागात पोलिसांवर वारंवार हल्ले होत आहेत.